Thursday, August 12, 2010

रायगड दर्शन व नंतरचा थरार...एक अनुभव.

मी माझा एक मित्र दोघांच्या कुटूंबासह रायगड दर्शनासाठी गेलो. गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर सह्याद्रीच्या उंचच उंच कड्यावर रायगडाचे एक टोक नजरेस पडले. रायगडावर मुख्य परंतु आम्ही रोप वे मध्ये बसुन रायगडावर पाऊल ठेवले. महाराष्ट्रातील एकुण ६५० गड्कोट किल्ल्यांपॆकी सर्वात दुर्गम आणि गौरवपुर्ण किल्ला म्हणजे रायगड. हा किल्ला शके ७०५ इ.स.७८३ मध्ये राष्ट्रकुटच्या काळात बांधला गेला. महाड पासुन २४ कि.मी. अंतरावर काळ आणि  गांधारी या नद्यांच्या विळख्यात हा अजस्त्र किल्ला दिमाखात उभा आहे. सह्याद्रीच्या कुशीतील हा अभेद्य व बळकट किल्ला छ.शिवाजी महाराजांची वॆभवशाली राजधानी म्हणून मानाने मिरवला. रायगडाला एकुण १४ नावे असल्याची माहीती मिळते. १) रायरी,२) रायगीरी, ३) जंबूव्दीप ,४) राजगीरी, ५) तणस, ६) राशिवटा, ७) इस्लामगड ,८) रायगड , ९) नंदादीप ,१०) बंदेनुर ,११) भिवेगड, १२) रेड्डी १३) राहीर १४) पुर्वेकडील जिब्राल्टर. (इंग्रजांनी ठेवलेले नांव) रायगड ही स्वराज्याची राजधानी असल्यामुळे तेथे १२ महाल आणि १८ कारखाने असे ३० विभाग होते. त्यमुळे प्रशासन व्यवस्थीत चाले. छ.शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथेच झाला, त्यांचे सिहांसन बालेकिल्ल्याच्या मध्यभागी होते, हे सिहांसन ३२ मन सोने, हिरे, नवरत्ने जड्वलेले होते अशी माहीती मिळाली. रायगडाला एकुन ५ दरवाजे होते मुख्य दरवाजा म्हणजे चित दरवाजा, नाना दरवाजा, मशिदमोर्चा, महादरवाजा, चोरदरवाजा. रायगडाच्या चढ्णीची सुरवात चित दरवाजातुन होते.     
 छ.शिवाजी महाराजांची वॆभवशाली राजधानी पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात आपलं मन नकळत शिवरायांच्या काळात रायगड कसा असेल या विचारात रमुन जातं आणि मग शिवरायांचा गॊरवशाली इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. रायगडावर दरबाराचे प्रवेशद्वार होळीचा माळ, टकमक टोक, बाजारपेठ, ब्राम्हणवाडा, राणीमहाल,सरदारवाडा, जगदिश्वराचे मंदीर व  जगदिश्वराच्या मंदीरसमोर रायगडावरील पृथ्वीमोलाचे लेणे राजे श्री शिवछत्रपतींची समाधी आहे. मुळ्च्या अष्टकोनी चॊथ-यावर श्री शिवाजी रायगड स्मारक समितीने ही घुमटी बांधलेली आहे. आत महाराजांचा अर्धाकॄती पुतळा आहे. रायगडावरील सर्व बांधकाम श्री हिरोजी इंदुळकर यांनी पुर्ण केले, बांधकामाची बिदागी जेव्हा राजेंनी देवु केली त्यावेळी मला काहीही नको फक्त माझे नांव प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी कोरण्यात यावे अशी मागणी इंदुळकरांनी केली ’सेवेशी तत्पर हिरोजी इंदुळकर " असा शिलालेख आजही तेथे पहायला मिळतो. 
    रायगड दर्शनासाठी एक-दोन दिवस पुरत नाहीत एवढा रायगड विस्ताराने मोठा आहे. रायगड पाहुन परत निघेपर्यंत संध्याकाळ झाली होती, रायगडवरुन पाय निघत नव्हता परंतु परत येणं आवश्यक असल्यामुळे आम्ही रोप वे च्या मार्गाने परत फिरलो. रायगड सोडुन निघाल्यानंतर महड मार्गे पुण्याकडे आमचे मार्गक्रमण चालु झाले. संध्याकाळ टळुन गेली होती त्यामुळे एका वाटसरुला पुण्याकडे जाण्याचा मार्ग विचारला ,त्याने सांगितलेल्या रस्त्याने आम्ही निघालो साधारणपणे रात्रीचे ८ वाजले असतील आम्ही वरंध घाटात प्रवेश केला, त्यानंतर आमच्या थरारक प्रवासाला सुरुवात झाली. निर्मनूष्य वरंध घाटात अवघड वळणे, रस्त्याच्या दुतर्फा दाट जंगल, रातकिड्यांचा किर्र.. आवाज आणि ह्र्दयाचा थरकाप उडवणारा काळोख यातुन आमचा प्रवास सुरु झाला. घाटामध्ये एकही वाहन, माणूस, घर, होटेल, आमच्या नजरेस पडत नव्हते त्यामुळे कुटूंबीयांसह आम्हीही मनातुन घाबरलेलो होतो. यापुर्वीही आम्ही रात्रीच्या वेळी बराच प्रवास केलेला होता परंतु वरंध घाटातील अनूभव खुपच घाबरवून टाकणारा होता. प्रत्येक वळ्ण संपल्यानंतर वाटायचे आता तरी सरळ रस्ता सुरू होइल व घाट संपेल, पण घाट संपायचे नांव नव्हते, प्रत्येक येणारे वळण सारखेच वाटायचे,  ह्ळूह्ळू वाटायला लागले की आपण रस्ता चुकलो आहोत, ते पाहण्यासाठी थांबण्याची हिंमत होत नव्हती  आणि त्यात रस्ता निर्मनूष्य त्यामुळे कोणाला विचारणेही शक्य नव्हते, ह्ळूह्ळु आम्ही देवाचा धावा सुरु केला, मध्येच आम्हाला मशालीसारखा एक प्रकाश दिसला , आम्हाला आमच्या पाठलागावर कोणीतरी असल्याचा भास होवु लागला, आम्हा सर्वांची भितीने गाळण उडाली, वाटायला लागले आता या घाटात आपली गाडी कोणी आडवली तर काय करायचे ?  तब्बल एक ते दिड तास आम्ही त्या भितीच्या छायेखाली प्रवास करीत होतो, त्यानंतर तो प्रकाश दिसेनासा झाला, पुढे  तब्ब्ल साडेचार तासाच्या मनाला गोठवून टाकणा-या वरंध घाटातील त्या जीवघेण्या प्रवासानंतर आम्हाला सरळ रस्ता दिसायला लागला, मग काही वेळातच भोर गांव लागले, आम्ही सुटकेचा श्वास घेतला. भोरला रात्री साडेबारा वाजता बसस्थानकाजवळ एक आजोबा भेटले त्यांना आम्ही पुण्याकडे जाण्याचा मार्ग विचारला त्यांनी कोठून आलात असा प्रश्न विचारला आम्ही रायगडावरुन निघुन वरंध घाटातुन आल्याचे सांगीतले त्यावर ते म्हणाले रात्रीच्या वेळी वरंध घाटातुन  कोणीच प्रवास करत नाही खुप धोकादायक आहे, तुमचे नशीब चांगले म्हणुन तुम्ही सुखरुप आलात, त्या घाटात यापुर्वी गाडी अडवुन मारहाणीच्या व गाडी घाटाखाली ढ्कलुन दिल्याच्या घटना घडलेल्या आहेत. हे ऎकल्यावर आम्ही गार झालो. शेवटी देवाचे आभार मानत आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली..
अमोल देशमुख,    
http://aapplimarathi/blogspot.com

No comments:

Post a Comment