Saturday, August 28, 2010

पाउस...

पावसाने माझे मन ओलेचिंब भिजले,
मनातील कोरडेपण मग जागीच थीजले,
पावसाच्या धारा अनं भिरभिरणारा वारा,
मनातील भावनांचा मग फुलेल पिसारा ...

Friday, August 27, 2010

किव करा त्यांची

द्वेषात त्यांच्या
त्यांचाच पराभव आहे
किव करा त्यांची
त्यांचा विवेक मेला आहे...
द्वेष ही त्यांची
आता संस्कृती झाली आहे
त्यांच्या पतनाची आता
वेळ जवळ आली आहे....
किती आले किती गेले
इतिहास काही बदलला नाही
त्यांनी तर अटकेपार झेंडे नेले
ग्रेड वाल्यांनी तर अजुन
महाराष्ट्राही पार नाही केले..

Tuesday, August 24, 2010

आता आमदारांनाही...

खासदारांना तर झाली
आता आमदारांनाही हवी आहे
जनतेसाठी तर खासदार-आमदारांना पगारवाढ
ही गोष्टच नवी आहे...

सालगडी..

लोकशाही चे मालक ही आता
नोकरासारखी पगारवाढ मागु लागले
सालगडी, नोकरदार मात्र हे ऎकुण
एकमेकाच्या तोंडाकडे बघु लागले..

Sunday, August 22, 2010

जनतेची कैवारी

खासदारांना पगारवढ
झाली भरतीच भारी..
खरचं यांना म्हणावे का
जनतेची कैवारी.. ?

Saturday, August 21, 2010

खासदारांची पगारवढ

खासदारांना दिला पगारवाढीचा मलिदा
आता ते खातील तुपाशी,
गरीब शेतक-यांच्या देशात मात्र
शेतकरीच मरतील उपाशी.
त्यांना झाली आहे भरघोस पगारवाढ
तरी ते संसदेत झोपा काढणार
जनतेचे प्रश्न तसेच राहतील
तेच मात्र आणखी सवलती मागणार
मग त्यांच्यावर सवलतींचा पाऊस पडेल
कारण तेच आता पृथ्वीवरील इंद्र
जनता मात्र पहात राहील आभाळाकडे
आणी वेड्यासारखे शोधत राहील अमावस्येचा चंद्र..

Monday, August 16, 2010

झी मराठी लिट्ल चॅम्प च्या ऑडीशनचा सुखद अनुभव...

प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या झी मराठी वरील लिट्ल चॅम्पस आयडीया सारेगम मुळे मुग्धा, कार्तीकी, आर्या, रोहीत, प्रथमेश ही नांवे रसिकांच्या ओठावर रेंगाळू लागली आहेत, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या लिट्ल चॅम्पस आयडीया सारेगम मुळे मुलांमध्ये संगीताविषयी मोठ्या प्रमाणात आवड निर्माण झालेली आहे. मुले नविन  लिट्ल चॅम्पस सारेगम परत केव्हा सुरु होणार याची आतुरतेने वाट पहात असतानाच झी मराठी ने ऑडीशनच्या तारखा जाहीर केल्या. माझी मुलगी सुध्दा याची आतुरतेने वाट पहात होती, ऑडीशनच्या जाहीराती सुरु झाल्या, ऑडीशन होणा-या केन्द्रांच्या नावांची माहीती मिळाल्यानंतर माझ्या मुलीला (आर्या) घेवुन ऑडीशनसाठी औरंगाबाद किंवा सोलापुर केंन्द्रावर जायचे आम्ही निश्चीत केले. ३ मे २०१० रोजी सोलापुर येथे ऑडीशनसाठी आम्ही गेलो. तेथे नोंदणी केल्यानंतर तिला क्रमांक २४३ मिळाला. आम्ही तिला ऑडीशनसाठी बोलावण्याची वाट पाहु लागलो. दोन तास जादुचे प्रयोग पाहील्यानंतर आर्याला ऑडीशनसाठी बोलावण्यात आले. ती आतमध्ये गेल्यानंतर आम्ही ती गाणे व्यवस्थीत म्हणेल का ? तिची निवड होइल का ? या विचारात असतानाच आर्या आली , मला तीच्या डोळे पाणावलेले दिसले, मी समजलो निवड झालेली दिसत नाही, तिची तयारी उत्तम झालेली होती तरीही निवड न झाल्यामुळे आमचेही मन थोडे नाराज झाले. तिला याबाबत विचारले असता , ती म्हणाली मला फक्त एका गाण्याचा मुखडा गायला लावला आणि जायला सांगितले, आम्ही तिची समजुत काढली, पुढील वेळेस परत प्रयत्न करु असे सांगुन पहीले पण ती ऎकेना, मी सर्वांची ऑडीशन संपल्यावर त्यांना भेटून याबद्दल विचारणार असा हट्ट तिने धरला. काही वेळातच ऑडीशन संपली, आर्या तिच्या आई सोबत सरळ ऑडीशन स्थळी गेली आणि तेथे तिची बासरीवादक श्री अमर ओक यांची भेट झाली त्यांनी काय काम आहे असे विचारताच तिने ऑडीशन बद्दल सांगीतले, त्यांनी तिला न कटवता एका तबला वादकाला सोबत बसवुन स्वत: संवादिका घेवुन तिची ऑडीशन परत घ्यायला सुरु केली, अमर ओक यांनी तिची एकुण १० वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऎकली, साधारणपणे दिड तास ही ऑडीशन चालली त्यांनी तिला गाताना तिच्या होणा-या चुकांबद्दल सविस्तरपणे सांगीतले, तुझा आवाज चांगला आहे परंतु तुला आणखी तयारीची गरज आहे असे सांगीतले, तिचे समाधान झाल्यानंतरच त्यांनी तिला निरोप दिला. अमर ओक यांना असे करण्याची काहीच आवशकता नव्हती, एकदा ऑडीशन झाल्यानंतर परत ऑडीशन घेण्याचीही गरज नसते, कोणी तशी विनंती केली तरी त्यांना पुढील ऑडीशनला येण्याचा सल्ला दिला जातो, परंतु अमर ओक यांच मोठेपण की त्यांनी माझ्या मुलीसाठी वेळ दिला, तसे पाहीले तर अमर ओक हे टी.व्ही.वरील लोकप्रीय बासरीवादक, महाराष्ट्रात ह्जारो मुलांचे ऑडीशन होणार, कोण्या एका मुलीसाठी परत ऑडीशन घेण्याची त्यांना काहीच गरज नव्ह्ती, त्यांना आम्हाला परत पाठवणे अवघड नव्हते, परंतु त्यांनी तसे केले नाही यातच त्यांचे मोठेपण, यामुळे तिचे नैराष्य मात्र दुर झाले, आता झी मराठी वर अमर ओक (बासरीवादक),निलेश परब (तबला वादक) दिसले की आम्हाला त्या प्रसंगाची आठवण होईल, हा सुखद अनुभव नेहमीसाठी स्मरणात राहील...         

Saturday, August 14, 2010

स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व मराठी ब्लॉगर्सना, मराठी प्रेमींना स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. लाखमोलाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या स्वातंत्र्यविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या स्वातंत्र्यविरांना मानाचा मुजरा..स्वातंत्रदिन चिरायु होवो

Thursday, August 12, 2010

रायगड दर्शन व नंतरचा थरार...एक अनुभव.

मी माझा एक मित्र दोघांच्या कुटूंबासह रायगड दर्शनासाठी गेलो. गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर सह्याद्रीच्या उंचच उंच कड्यावर रायगडाचे एक टोक नजरेस पडले. रायगडावर मुख्य परंतु आम्ही रोप वे मध्ये बसुन रायगडावर पाऊल ठेवले. महाराष्ट्रातील एकुण ६५० गड्कोट किल्ल्यांपॆकी सर्वात दुर्गम आणि गौरवपुर्ण किल्ला म्हणजे रायगड. हा किल्ला शके ७०५ इ.स.७८३ मध्ये राष्ट्रकुटच्या काळात बांधला गेला. महाड पासुन २४ कि.मी. अंतरावर काळ आणि  गांधारी या नद्यांच्या विळख्यात हा अजस्त्र किल्ला दिमाखात उभा आहे. सह्याद्रीच्या कुशीतील हा अभेद्य व बळकट किल्ला छ.शिवाजी महाराजांची वॆभवशाली राजधानी म्हणून मानाने मिरवला. रायगडाला एकुण १४ नावे असल्याची माहीती मिळते. १) रायरी,२) रायगीरी, ३) जंबूव्दीप ,४) राजगीरी, ५) तणस, ६) राशिवटा, ७) इस्लामगड ,८) रायगड , ९) नंदादीप ,१०) बंदेनुर ,११) भिवेगड, १२) रेड्डी १३) राहीर १४) पुर्वेकडील जिब्राल्टर. (इंग्रजांनी ठेवलेले नांव) रायगड ही स्वराज्याची राजधानी असल्यामुळे तेथे १२ महाल आणि १८ कारखाने असे ३० विभाग होते. त्यमुळे प्रशासन व्यवस्थीत चाले. छ.शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथेच झाला, त्यांचे सिहांसन बालेकिल्ल्याच्या मध्यभागी होते, हे सिहांसन ३२ मन सोने, हिरे, नवरत्ने जड्वलेले होते अशी माहीती मिळाली. रायगडाला एकुन ५ दरवाजे होते मुख्य दरवाजा म्हणजे चित दरवाजा, नाना दरवाजा, मशिदमोर्चा, महादरवाजा, चोरदरवाजा. रायगडाच्या चढ्णीची सुरवात चित दरवाजातुन होते.     
 छ.शिवाजी महाराजांची वॆभवशाली राजधानी पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात आपलं मन नकळत शिवरायांच्या काळात रायगड कसा असेल या विचारात रमुन जातं आणि मग शिवरायांचा गॊरवशाली इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. रायगडावर दरबाराचे प्रवेशद्वार होळीचा माळ, टकमक टोक, बाजारपेठ, ब्राम्हणवाडा, राणीमहाल,सरदारवाडा, जगदिश्वराचे मंदीर व  जगदिश्वराच्या मंदीरसमोर रायगडावरील पृथ्वीमोलाचे लेणे राजे श्री शिवछत्रपतींची समाधी आहे. मुळ्च्या अष्टकोनी चॊथ-यावर श्री शिवाजी रायगड स्मारक समितीने ही घुमटी बांधलेली आहे. आत महाराजांचा अर्धाकॄती पुतळा आहे. रायगडावरील सर्व बांधकाम श्री हिरोजी इंदुळकर यांनी पुर्ण केले, बांधकामाची बिदागी जेव्हा राजेंनी देवु केली त्यावेळी मला काहीही नको फक्त माझे नांव प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी कोरण्यात यावे अशी मागणी इंदुळकरांनी केली ’सेवेशी तत्पर हिरोजी इंदुळकर " असा शिलालेख आजही तेथे पहायला मिळतो. 
    रायगड दर्शनासाठी एक-दोन दिवस पुरत नाहीत एवढा रायगड विस्ताराने मोठा आहे. रायगड पाहुन परत निघेपर्यंत संध्याकाळ झाली होती, रायगडवरुन पाय निघत नव्हता परंतु परत येणं आवश्यक असल्यामुळे आम्ही रोप वे च्या मार्गाने परत फिरलो. रायगड सोडुन निघाल्यानंतर महड मार्गे पुण्याकडे आमचे मार्गक्रमण चालु झाले. संध्याकाळ टळुन गेली होती त्यामुळे एका वाटसरुला पुण्याकडे जाण्याचा मार्ग विचारला ,त्याने सांगितलेल्या रस्त्याने आम्ही निघालो साधारणपणे रात्रीचे ८ वाजले असतील आम्ही वरंध घाटात प्रवेश केला, त्यानंतर आमच्या थरारक प्रवासाला सुरुवात झाली. निर्मनूष्य वरंध घाटात अवघड वळणे, रस्त्याच्या दुतर्फा दाट जंगल, रातकिड्यांचा किर्र.. आवाज आणि ह्र्दयाचा थरकाप उडवणारा काळोख यातुन आमचा प्रवास सुरु झाला. घाटामध्ये एकही वाहन, माणूस, घर, होटेल, आमच्या नजरेस पडत नव्हते त्यामुळे कुटूंबीयांसह आम्हीही मनातुन घाबरलेलो होतो. यापुर्वीही आम्ही रात्रीच्या वेळी बराच प्रवास केलेला होता परंतु वरंध घाटातील अनूभव खुपच घाबरवून टाकणारा होता. प्रत्येक वळ्ण संपल्यानंतर वाटायचे आता तरी सरळ रस्ता सुरू होइल व घाट संपेल, पण घाट संपायचे नांव नव्हते, प्रत्येक येणारे वळण सारखेच वाटायचे,  ह्ळूह्ळू वाटायला लागले की आपण रस्ता चुकलो आहोत, ते पाहण्यासाठी थांबण्याची हिंमत होत नव्हती  आणि त्यात रस्ता निर्मनूष्य त्यामुळे कोणाला विचारणेही शक्य नव्हते, ह्ळूह्ळु आम्ही देवाचा धावा सुरु केला, मध्येच आम्हाला मशालीसारखा एक प्रकाश दिसला , आम्हाला आमच्या पाठलागावर कोणीतरी असल्याचा भास होवु लागला, आम्हा सर्वांची भितीने गाळण उडाली, वाटायला लागले आता या घाटात आपली गाडी कोणी आडवली तर काय करायचे ?  तब्बल एक ते दिड तास आम्ही त्या भितीच्या छायेखाली प्रवास करीत होतो, त्यानंतर तो प्रकाश दिसेनासा झाला, पुढे  तब्ब्ल साडेचार तासाच्या मनाला गोठवून टाकणा-या वरंध घाटातील त्या जीवघेण्या प्रवासानंतर आम्हाला सरळ रस्ता दिसायला लागला, मग काही वेळातच भोर गांव लागले, आम्ही सुटकेचा श्वास घेतला. भोरला रात्री साडेबारा वाजता बसस्थानकाजवळ एक आजोबा भेटले त्यांना आम्ही पुण्याकडे जाण्याचा मार्ग विचारला त्यांनी कोठून आलात असा प्रश्न विचारला आम्ही रायगडावरुन निघुन वरंध घाटातुन आल्याचे सांगीतले त्यावर ते म्हणाले रात्रीच्या वेळी वरंध घाटातुन  कोणीच प्रवास करत नाही खुप धोकादायक आहे, तुमचे नशीब चांगले म्हणुन तुम्ही सुखरुप आलात, त्या घाटात यापुर्वी गाडी अडवुन मारहाणीच्या व गाडी घाटाखाली ढ्कलुन दिल्याच्या घटना घडलेल्या आहेत. हे ऎकल्यावर आम्ही गार झालो. शेवटी देवाचे आभार मानत आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली..
अमोल देशमुख,    
http://aapplimarathi/blogspot.com