Monday, August 16, 2010

झी मराठी लिट्ल चॅम्प च्या ऑडीशनचा सुखद अनुभव...

प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या झी मराठी वरील लिट्ल चॅम्पस आयडीया सारेगम मुळे मुग्धा, कार्तीकी, आर्या, रोहीत, प्रथमेश ही नांवे रसिकांच्या ओठावर रेंगाळू लागली आहेत, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या लिट्ल चॅम्पस आयडीया सारेगम मुळे मुलांमध्ये संगीताविषयी मोठ्या प्रमाणात आवड निर्माण झालेली आहे. मुले नविन  लिट्ल चॅम्पस सारेगम परत केव्हा सुरु होणार याची आतुरतेने वाट पहात असतानाच झी मराठी ने ऑडीशनच्या तारखा जाहीर केल्या. माझी मुलगी सुध्दा याची आतुरतेने वाट पहात होती, ऑडीशनच्या जाहीराती सुरु झाल्या, ऑडीशन होणा-या केन्द्रांच्या नावांची माहीती मिळाल्यानंतर माझ्या मुलीला (आर्या) घेवुन ऑडीशनसाठी औरंगाबाद किंवा सोलापुर केंन्द्रावर जायचे आम्ही निश्चीत केले. ३ मे २०१० रोजी सोलापुर येथे ऑडीशनसाठी आम्ही गेलो. तेथे नोंदणी केल्यानंतर तिला क्रमांक २४३ मिळाला. आम्ही तिला ऑडीशनसाठी बोलावण्याची वाट पाहु लागलो. दोन तास जादुचे प्रयोग पाहील्यानंतर आर्याला ऑडीशनसाठी बोलावण्यात आले. ती आतमध्ये गेल्यानंतर आम्ही ती गाणे व्यवस्थीत म्हणेल का ? तिची निवड होइल का ? या विचारात असतानाच आर्या आली , मला तीच्या डोळे पाणावलेले दिसले, मी समजलो निवड झालेली दिसत नाही, तिची तयारी उत्तम झालेली होती तरीही निवड न झाल्यामुळे आमचेही मन थोडे नाराज झाले. तिला याबाबत विचारले असता , ती म्हणाली मला फक्त एका गाण्याचा मुखडा गायला लावला आणि जायला सांगितले, आम्ही तिची समजुत काढली, पुढील वेळेस परत प्रयत्न करु असे सांगुन पहीले पण ती ऎकेना, मी सर्वांची ऑडीशन संपल्यावर त्यांना भेटून याबद्दल विचारणार असा हट्ट तिने धरला. काही वेळातच ऑडीशन संपली, आर्या तिच्या आई सोबत सरळ ऑडीशन स्थळी गेली आणि तेथे तिची बासरीवादक श्री अमर ओक यांची भेट झाली त्यांनी काय काम आहे असे विचारताच तिने ऑडीशन बद्दल सांगीतले, त्यांनी तिला न कटवता एका तबला वादकाला सोबत बसवुन स्वत: संवादिका घेवुन तिची ऑडीशन परत घ्यायला सुरु केली, अमर ओक यांनी तिची एकुण १० वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऎकली, साधारणपणे दिड तास ही ऑडीशन चालली त्यांनी तिला गाताना तिच्या होणा-या चुकांबद्दल सविस्तरपणे सांगीतले, तुझा आवाज चांगला आहे परंतु तुला आणखी तयारीची गरज आहे असे सांगीतले, तिचे समाधान झाल्यानंतरच त्यांनी तिला निरोप दिला. अमर ओक यांना असे करण्याची काहीच आवशकता नव्हती, एकदा ऑडीशन झाल्यानंतर परत ऑडीशन घेण्याचीही गरज नसते, कोणी तशी विनंती केली तरी त्यांना पुढील ऑडीशनला येण्याचा सल्ला दिला जातो, परंतु अमर ओक यांच मोठेपण की त्यांनी माझ्या मुलीसाठी वेळ दिला, तसे पाहीले तर अमर ओक हे टी.व्ही.वरील लोकप्रीय बासरीवादक, महाराष्ट्रात ह्जारो मुलांचे ऑडीशन होणार, कोण्या एका मुलीसाठी परत ऑडीशन घेण्याची त्यांना काहीच गरज नव्ह्ती, त्यांना आम्हाला परत पाठवणे अवघड नव्हते, परंतु त्यांनी तसे केले नाही यातच त्यांचे मोठेपण, यामुळे तिचे नैराष्य मात्र दुर झाले, आता झी मराठी वर अमर ओक (बासरीवादक),निलेश परब (तबला वादक) दिसले की आम्हाला त्या प्रसंगाची आठवण होईल, हा सुखद अनुभव नेहमीसाठी स्मरणात राहील...         

No comments:

Post a Comment