Friday, September 3, 2010

"ज्ञानाची बचत हीच ज्ञानाची निर्मीती"..मा.रामदासजी फुटाणे यांनी सांगीतलेला मजेशीर किस्सा..

आमच्या माजलगांव येथे रोटरी क्लबच्या २०१० च्या पदग्रहण समारंभात प्रसीध्द कवी, वात्रटीकाकार मा.आ.रामदासजी फुटाणे यांनी आपल्या भाषणातुन सांगीतलेला हा गंमतीशीर किस्सा.
    महाराष्ट्राच्या उर्जा खात्याने वाढलेल्या विजेच्या समस्येवर उपाय करायचे ठरवले, विजेची मागणी जास्त आणि विजेची निर्मीती कमी यामुळे "लोडशेडींग" चा पर्याय ही शासनानेच काढला होता त्यापुढे जावुन "विजेची बचत हिच विजेची निर्मीती"  ही संकल्पना राबवायचे असे उर्जामंत्र्यांनी ठरवले,  उर्जा खात्याच्या सर्व उच्च अधिका-यांच्या बैठ्कीत ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे ठरले, त्यानुसार राज्यातील प्रत्येक शहरात, गावांत वाड्या वस्त्यांवर या योजनेच्या प्रसीध्दीसाठी मोठे मोठे  बॅनर लावायचे ठरले, त्यासाठी लाखो रुपयांचे बजेट मंजुर करण्यात आले, राजकीय चालीरिती प्रमाणे बॅनर लावायचे काम ज्याला द्यायचे होते त्याला देण्यात आले, बॅनर लावायचे काम पुर्ण झाल्यानंतर याचा अहवाल उर्जामंत्र्यांना देण्यात आला. उर्जामंत्र्यांनाही रोज मंत्रालयात जाताना, दौ-यावर असताना या "विजेची बचत हिच विजेची निर्मीती" योजनेचे लाईटच्या झगमगाटातले मोठे बॅनर दिसु लागले, परंतु उर्जा खात्याला त्याचा फारसा प्रभाव जाणवत नव्हता, एवढा गाजावाजा, जाहीरात करुनही फारसा फरक का पडत नाही हे कोणालाच कळत नव्हते शेवटी मत्र्यांनी ग्रामीण भागात जावुनच खरे चित्र पहायचे ठरवले.
    मंत्री पाहणी करण्यासाठी ग्रामीण भागाच्या दौ-यावर निघाले, एका गावांत जाण्यासाठी त्यांच्या गाड्यांचा ताफा आत वळला, वळणदार रस्त्यांनी "वळसे" घेत "वळसे" घेत त्यांनी गावात प्रवेश केला, गावाच्या वेशीजवळ त्यांना "विजेची बचत हिच विजेची निर्मीती" योजनेचे मोठे बॅनर दिसले तेथे त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला, त्यांना पाहुन गावक-यांनी त्यांच्यापाशी गर्दी केली मंत्री महोदयांनी गावक-यांना विज बचतीबद्दल सांगुन लोड्शेडींगच्या त्रासातुन लवकर मुक्तता हवी असेल तर विजेची बचत किती आवश्यक आहे हे समजावुन सांगीतले, त्यानंतर गावातल्या इतर शासकीय योजना, गावातील दवाखाना, शाळा याबद्दल विचारले त्यावर गावक-यांनी सर्वकाही ठीक आहे परंतु शाळा मात्र बंद आहे असे उत्तर दिले, मंत्री महोदयांनी शाळा का बंद आहे हे वारंवर विचारले असता गावक-यांनी मंत्री महोदयांना एकसुरात उत्तर दिले की "ज्ञानाची बचत हीच ज्ञानाची निर्मीती" त्यानंतर मात्र मंत्री महोदयांनी कपाळावर हात मारुन घेत तेथून काढता पाय घेतला...........

No comments:

Post a Comment