Tuesday, September 21, 2010

११० वर्षाचा नवसाला पावणारा टेंबे गणपती...

महाराष्ट्रात १०० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची परंपरा असनारे जे मोजके गणपती आहेत त्यामध्ये माजलगांव जि.बीड (मराठवाडा) येथील नवसाला पावणारा धुंडीराज टेंबे गणपती प्रसिध्द आहे. ११० वर्षाची ऐतिहासीक परंपरा असलेला टेंबे गणपती गणेश चतुर्थीला स्थापन न होता भाद्रपद शुध्द एकदशीला स्थापीत होतो व त्याचे विसर्जन देखील अनंत चतुर्द्शीला न होता प्रतीपदेला होते. असे का ,त्याची परंपरा अशी का पडली त्याला संघर्षाचा इतिहास आहे. त्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालेले नव्हते, मराठ्वाडात इंग्रजाचा मांड्लीक निजाम याची राजवट होती, त्यावेळी टेंबे गणेशाची मिरवणुक काही समाजकंटकांनी अडवली होती, त्यामुळे त्याजागेवरच गणपतीची मुर्ती ठेवुन टेंबे गणेशाच्या संस्थापक ब्राम्हण मंडळींनी हैद्राबादच्या निजामाकडे जावुन त्याच्याकडुन ताम्रपत्रावर परवानागी आणली व त्यानंतर वाजतगाजत मिरवणुक काढण्यात आली, त्यामुळे आजतागायत टेंबे गणेशाची भाद्रपद शुध्द एकदशीला स्थापना होते व विसर्जन  प्रतीपदेला होते. त्याकाळी नवसाची पुर्ती होण्यासाठी भाविक भक्त हाती मिरवणुकीत टेंबा धरत, त्यांचे नवस पुर्ण होत ती परंपरा आजही कायम आहे, या नवसाच्या टेंब्यामुळेच या गणपतीचे नांव टेंबे गणपती पडले. नवसाला पावाणारा टेंबे गणपती म्हणुन या गणपतीची किर्ती आज उभ्या महाराष्ट्र्भर पसरलेली आहे, या टेबे गणेशाचे दर्शन घेण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुन गणेशभक्तांची रीघ लागलेली असते. या गणेशाची ७ ते ८ फुटी मुर्ती येथील मुर्तीकार गोंदीकर हे  स्वत: तयार करतात. सर्व गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर टेंबे गणेशाचे विसर्जन असल्यामुळे टेंबे गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत सर्वच जातीधर्माचे लोक मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहाने सामील होतात. अशा ११० वर्षाचा नवसाला पावाणारा  टेंबे गणपतीचे दर्शन घ्यायला आपण एकवेळ जरुर  यावे...
  

1 comment:

  1. नमस्कार,
    आपला ब्लॉग मोगरा फुललासोबत http://www.mogaraafulalaa.com/2010/04/marathi-bloggers-2.html या लिंकवर जोडला गेला आहे.
    धन्यवाद.

    ReplyDelete